
कर्जत शहर आणि परिसरातील मातृत्वाची जननी भामाबाई राऊत..
रविवारी भाऊ आणि माऊलींचा अमृत महोत्सव सोहळा पडणार पार…
कर्जत प्रतिनिधी –
कर्जत शहर आणि परिसरातील अनेक बाळंतपण सहज आणि लीलया सुखरूप करण्यात भामाबाई राऊत यांचा हातखंडा. आपल्या वयाच्या पंच्याहत्तरीत त्यांनी आजमितीस जवळपास ४ हजार बाळंतपण पार पाडले. ते पण सेवाभावी वृत्तीने. आज दळण-वळणाची साधने उपलब्ध आहेत मात्र जेव्हा साधनांची कमतरता होती त्याकाळी पायी तर कधी सायकलवर आणि बैलगाडीचा आधार घेत या माऊलीने अनेकांना विना मोबदला मातृत्वाचे सुख दिले. याकामी त्यांना पती चंद्रकांत(भाऊ) राऊत यांनी मोलाची साथ दिली. रविवारी या दाम्पत्याचा अमृत महोत्सव सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहीबाई पोपरे, बारामती ऍग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार आणि आ राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे उपस्थित राहणार आहे.
चंद्रकांत निवृत्ती राऊत यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. वडील निवृत्ती राऊत मुक्या जनावरांची सेवा, गाया गुरांचे आजारपण काढत असत. बुवासाहेब महाराजांची पूजाअर्चा करत असत. २ भाऊ व ५ बहिणी असा भाऊंचा परिवार जेम-तेम परिस्थितीमुळे काही दिवस शेतकऱ्यांकडे सालकरी म्हणून काम केले. त्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी कुंभारगाव येथील गंगाधर मेहेर यांच्या पाचव्या मुलीशी अर्थात भामाबाई यांच्याशी १९६२ साली विवाह झाला. भामाबाईना ९ बहिणी होत्या. नंतरच्या कालखंडात कर्जत येथील एस.टी. स्टँडवर हमालीचे काम करत, शेतकऱ्यांचा माल व येणारे पार्सल यांची जोखमीने चढउतार करण्याचे काम केले. याच कामातून कुटुंबाची रोजी रोटी भागवली. जीवनाशी संघर्ष करत पत्नी भामाबाई यांच्या साथीने ३ मुले व १ मुलगी यांचा सांभाळ करत उज्ज्वल आयुष्याची दिशा दाखवली. प्रसंगी आर्थिक चणचणीमुळे चटणी भाकर खात स्वाभिमानाने संसार पुढे नेला. भावंडांची व बहिणीची लग्न, कार्य यांची जबाबदारी पार पाडून प्रत्येकास स्वबळावर उभे केले. भाऊ आणि भामाबाई यांच्या संघर्षाच्या काळात नामदेव तात्या सोनमाळी आणि सोनाबाई नामदेव सोनमाळी हे पाठीशी उभे राहिले. वडगाव रोडवरील त्यांच्या सोनमाळी वस्ती येथे राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्या ठिकाणी छप्पर टाकून संसाराची खऱ्या अर्थान सुरुवात झाली.
जेव्हा कर्जतला दवाखाना व डॉक्टरांची कमतरता होती. तेव्हा निस्वार्थ भावनेतून गोरगरीब महिलांचे बाळंतपण यशस्वीरित्या करण्याचे उदात्तकार्य भामाबाई निस्पृह भावनेने पार पाडत. गोरगरिबांच्या अडी-अडचणीला माता भगिनींची सुखरूप बाळंतपण भामाबाईंनी यशस्वी करून दाखविली. आजच्या आधुनिक जगात जेंव्हा डॉक्टर एखाद्या पेशंटला सीझर करण्यास सल्ला देतात अशा अनेक महिलांच्या नॉर्मल डिलीव्हरी भामाबाई राऊत यांनी लीलया पार पाडल्या. गरोदर महिलेच्या पोटात आडवे असलेले बाळ हातोटीने पोटातच व्यवस्थित करून आई व बाळ यांना इजा न होऊ देता बाळंतपण केली. पोटातील बाळाच्या मानेला नाळेचा पडलेला वेढा काढून बाळंतपण व्यवस्थित केली. गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यात पोटात दगावलेले बाळ असताना महिलांची सुखरूप सुटका केली शक्य होईल तेव्हा बाळाला आंघोळ घालण्यापासून ते बाळाची शारीरिक निगा राखणे त्यांची शारीरिक वाढ यावर येता-जाता लक्ष ठेवत. यासाठी प्रयत्न केले. येथूनच भामाबाई ह्या कर्जतकरांच्या भामाआई- आणि भामा मावशी झाल्या. सर्वसामान्यांची विवाह जमवण्यापासून ते लग्न पार पडेपर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात. अंत्यविधीच्या वेळी हळदी- कुंकुवाचा सडा घालण्यापासून अंत्यविधीपर्यंतची मदत अनेक कुटुंबाना करतात. घरातील लहान मुलं आणि पती यांचा विचार न करता फक्त गोरगरीबांची सेवा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवत संसार पुढे नेले. आपल्या दारी आलेल्या प्रत्येक माणसाचा योग्य पाहुणचार करत अन्नधान्यापासून त्यांच्या मान-सन्मान गरजेनुसार मदत करणे ते कायम ठेवतात. आपल्या तीन मुलांपैकी एकास व्यावसायिक क्षेत्रात, दुसरा शेतीव्यवसायात तर तिसरा राजकीय क्षेत्रात देत कौटुंबिक जबाबदारी देखील पार पाडली. याकामी पती चंद्रकांत राऊत यांनी त्यांना दिलेली मोलाची साथ भामाबाई सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावले जातात. जुन्या काळात पहाटेच्या वेळी जात्यावर दळण दळून ओव्या म्हणत दिवसाची आनंदाने सुरुवात करणाऱ्या भामा मावशीना संसारात साथ देत श्रीगोंदा डेपो येथे वॉचमनची नोकरी करत असताना भाऊ २००१ साली रिटायर झाले.