आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

संशोधन, कला व क्रीडा क्षेत्रात दादा पाटील महाविद्यालयात महिला राज

कर्जत प्रतिनिधी

संशोधन, कला व क्रीडा क्षेत्रात दादा पाटील महाविद्यालयात महिला राज


कर्जत, दि.८(प्रतिनिधी) :

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील दादा पाटील महाविद्यालयातील प्राध्यापिका व विद्यार्थिनींनी संशोधन,कला व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केलेले आहे. या माध्यमातून महाविद्यालयात जणू महिला राजच प्रस्थापित झाले असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी दिली.
वनस्पतीशास्त्र विषयाच्या डॉ. आशा कदम यांनी संशोधन केलेल्या गर्भनिरोधक औषधाच्या फॉर्म्युल्याला भारतीय पेटंट कार्यालयाने नुकतीच मान्यता दिली आहे. या विषयावर त्यांनी दहा वर्षे संशोधन केले. त्यांनी तयार केलेले हे औषध १०० टक्के आयुर्वेदिक असून त्याचा वापर केल्याने गर्भाशयावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. तर वनस्पतीशास्त्र विषयाच्याच डॉ. प्रतिष्ठा नागणे यांनीही ऑस्ट्रेलीयात दाखल केलेल्या व निवडुंग, गुळवेल आणि कोरफड यापासून बनविलेल्या आर्कमुळे ब्लड कॅन्सर बरा होतो. हे या पेटंटने दाखवून दिले आहे.त्यांच्या या संशोधनावरील पेटंटला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. ग्रामीण भागातील दादा पाटील महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात तर अग्रेसर आहेच; परंतु संशोधन क्षेत्रातही या दोन पेटंटच्यारुपाने महाविद्यालयाने पुढचे पाऊल उचलले असून पुढील संशोधनासाठी नवीन संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळणार आहे.
तर दुसरीकडे महाविद्यालयातील विद्यार्थिनीही काही कमी नाहीत. त्यांनीही कला व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कु. माधवी घालमे या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन मराठी निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावून उत्तुंग यश संपादन केलेले आहे.
तर महाविद्यालयातील कु. शर्वरी खराडे या विद्यार्थिनीने गोवा येथे नुकत्याच झालेल्या २२व्या राष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट (तलवारबाजी) या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदक पटकावले आहे. तर कु. संस्कृती शिंदे या विद्यार्थिनीनेही ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे. यापूर्वी तेलंगणा येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतही तिने उत्तुंग कामगिरी केलेली आहे.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर व बप्पासाहेब धांडे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नगरकर व सर्व स्टाफसह अनेकांनी अभिनंदन केले आहे. याशिवाय दादा पाटील महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके ,उपाध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, उपाध्यक्ष नितीन धांडे, सहसचिव दत्तात्रय नेवसे, माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य विजय तोरडमल, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज पाटील, उद्योजक भागवत तोरडमल, त्र्यंबक खराडे यांनीही महाविद्यालयात येऊन या खेळाडूंचा आदरपूर्वक सत्कार करून अभिनंदन केले आहे.सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे