कर्जत प्रतिनिधी. दि १७
समाजात एकता, समता आणि बंधूता वाढीस लागावी या परिषदेचा मुख्य उद्देश असून या माध्यमातून सर्वानी एकत्र येत विचारांची देवाण-घेवाण करावी यासाठी आयोजित केली जाते. पोलिसांना फक्त दोनच जाती माहित असतात एक फिर्यादी आणि दुसरी गुन्हेगारांची. त्यामुळे पोलीस कायम जात पक्ष विरहित भूमिका पार पाडते असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी केले. ते कर्जत येथे शारदाबाई पवार सभागृहात पोलीस विभाग आयोजित जातीय सलोखा सामाजिक एकता परिषदेत बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अड केदार केसकर, कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पोलीस महानिरीक्षक शेखर म्हणाले की, माणसाकडे पैशाची श्रीमंती नसावी. विचारांची श्रीमंती असावी. त्याच विचाराने त्याची ओळख निर्माण होते. समाजात एकता निर्माण करण्यासाठी सर्वानी पुढे येणे आवश्यक आहे. एकतेचे विचार नवीन समाज घडवतो तेव्हा त्याची प्रगती होते. सामाजिक भूमिका एकोप्याने सोडवली तर अट्रोसिटी गुन्हयाचे प्रमाण निश्चित कमी होतील. आज माणूस इतिहास विसरत चालल्याने समाजातील एकता-एकोपा कमी होत चालला आहे. महापुरुषांचे इतिहास वाचून समाजाची प्रगती साधावी. विकास करायचा असेल तर वाद-तंटे नसावे. शांती जेथे असते तेथेच विकास होतो. माणसाला माणसाप्रमाणे वागविल्यास गुन्ह्याची संख्या कमी होते असा आपला अनुभव असल्याचे शेखर यांनी म्हंटले.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की, न्यायालय आणि कायद्याप्रमाणे सर्वांची फिर्याद-तक्रार घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे गुन्ह्याची संख्या वाढत असली तरी तपासात सत्य निष्पन्न करण्याचे काम पोलीस विभागाचे असते. दोषारोप पत्रात गुन्ह्याची सर्व पार्श्वभूमी सिद्ध होते. त्यामुळे खोटे गुन्हे न्यायालयात टिकत नाही. ज्याच्यावर अन्याय होतो त्यास निश्चित न्याय मिळतो. सामाजिक बांधिलकी जपणे प्रत्येकाचे कर्तव्य असून या एकता परिषदेच्या माध्यमातून समता, बंधुता आणि एकता वाढीस मदत मिळेल असा आपल्याला विश्वास आहे.
यावेळी सरकारी वकील केदार केसकर म्हणाले की, अन्यायाला न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने खंबीर भूमिका घेणे आवश्यक आहे. गुन्हा खरा असला की न्यायालय त्यास शिक्षा देण्यासाठी सक्षम आहे. यावेळी घनश्याम शेलार, अड अरुण जाधव, नगराध्यक्षा उषा राऊत, अड दत्तात्रय चव्हाण, भाऊसाहेब रानमाळ, मीरा शिंदे, तुकाराम पवार, नामदेव भोसले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले. उपअधीक्षक जाधव यांनी वर्षानिहाय दाखल झालेल्या गुन्ह्याचा आढावा सांगितला. यात कर्जत पोलीस उपविभागाने ज्या गुन्ह्याची उकल केली त्याची माहिती उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी मानले.
……………………
चौकट : पोलीस विभागाने गुन्हा दाखल करताना घटनेची पार्श्वभूमी पहावी. विनाकारण कोणाच्या दबावाखाली येत खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यास अटकाव आणावा. नाहीतर खरे गुन्हेगार बाजूला होत निरपराध लोकांना त्याची शिक्षा होत आहे. एखादा खोटा गुन्हा त्या व्यक्तीची, त्याच्या कुटुंबियांची मानसिकता बिघडून टाकणारी सुद्धा ठरते. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांने गुन्ह्याची सत्यता पाहतच गुन्हा दाखल करावा अशी मागणी अनेक वक्त्यांनी केली.
………………….
सामाजिक परिषदेच्या ऐवजी प्रगतीच्या परिषद घेतल्या पाहिजे – अड अरुण जाधव
पोलीस आणि जनतेचा संवाद झाला की गुन्ह्याची संख्या कमी होते असे निदर्शनास येते. त्यामुळे पोलीस विभागाने जनतेस निःपक्षपाती भूमिकेचे विश्वास दिला पाहिजे. अनेक गुन्ह्यात पोलिसांवर दबाव आणला जातो. प्रथमता जो दबाव आणतो त्याचा कार्यक्रम करा. म्हणजे दलाली बंद होईल. आणि दलाली बंद झाले की कायद्याचा धाक निर्माण होईल. कायद्याचा धाक आणि जरब निर्माण झाला की गुन्हेगारी कमी होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा