ब्रेकिंग
अन्यायाच्या विरोधात कर्जत नगरपंचायतीत उपोषण….
राजकीय द्वेषापोटी नगरपंचायतच्या तीन कर्मचारी यांच्यावर अन्याय केला आहे.

2
3
4
7
9
2
अन्यायाच्या विरोधात कर्जत नगरपंचायतीत उपोषण….
कर्जत प्रतिनिधी
कर्जत नगरपंचायतीचे कार्यालयीन प्रमुख यांनी तीन कर्मचाऱ्यांना कोणतेही कायदेशीर नोटीस न देता कामावरून कमी करून तसेच केलेल्या कामाचे वेतन अदा न करता केवळ राजकीय द्वेषापोटी अन्याय केला आहे. आम्हास थकीत पगाराची रक्कम मिळावी यासह पुन्हा सेवेत सामावून घ्यावे. अन्यथा दि २३ मार्च रोजी कार्यालयाच्या आवारात कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा संबंधित कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना दिला आहे.सोमनाथ थोरात, अशोक धांडे आणि अक्षय साळुंके हे कर्जत नगरपंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते. यापैकी थोरात आणि धांडे अग्निशमन विभागात तर साळुंके हे शिपाई पदावर काम करीत. ज्या विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता भासेल त्या ठिकाणी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत होते. कार्यालयाचे प्रमुख रवींद्र साठे यांनी वरील तिघांना कोणतेही कायदेशीर नोटीस न देता तसेच म्हणणे मांडण्याची संधी न देता कार्यात कसूर अथवा चूक नसताना दि १० जानेवारी रोजी भ्रमणध्वनीवरून कामावरून येऊ नका. आपणांस कामावरून कमी करण्यात येत असल्याचे कळविले. वास्तविक पाहता तिघांनी कर्जत नगरपंचायतीमध्ये कोरोना महामारीच्या काळात प्रामाणिकपणे ४ ते ५ वर्षांपासून काम बजावले आहे. कामात कसलाही कसूर नसताना केवळ राजकीय भावना आणि आकसाने आमच्यावर कारवाई करण्यात आली असून याने आमच्यावर आणि कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली. सदरची कारवाई आमच्यावर अन्यायकारक आहे आम्हास न्याय द्यावा. तसेच सेवेत पुन्हा सामावून घ्यावे. यासह केलेल्या कामाचे वेतन, मिळणारे सर्व लाभ रक्कम तात्काळ मिळावे अशी मागणी मुख्याधिकारी कर्जत नगरपंचायत यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा गुरुवार, दि २३ रोजी कर्जत नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर कुटुंबियांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा वरील तिन्ही कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
………………………………………………………….
चौकट : आपण केवळ कर्जत नगरपंचायतीचा आदेश बजावला – रवींद्र साठे
कर्जत नगरपंचायतीची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने कर्जत नगरपंचायतीच्या आदेशान्वये पाणीपुरवठा आणि इतर काही अनावश्यक असणारे ठेकेदारी कर्मचारी यांना कमी करण्यात आले आहे. यामध्ये आपला कसलाही राजकीय द्वेष नसून आपण फक्त वरिष्ठांचा आदेश बाजाविण्याचे काम केले आहे.
– रवींद्र साठे,कार्यालयीन प्रमुख
कर्जत नगरपंचायत.
……………………………………………….…….