कुकडी लाभक्षेत्रात भु संपादित झालेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाईसाठी ८७वर्षिय वृद्ध आजोबांचे कर्जत तहसील कार्यालयात आमरण उपोषण….
कर्जत प्रतिनिधी:-
कुकडी लाभक्षेत्रात भु संपादित झालेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई आपल्या परस्पर आणि विनासंमती कुकडी विभागाने इतर लाभार्थींना अदा केली. याबाबत वारंवार आंदोलन आणि पाठपुरावा केला मात्र न्याय मिळत नसल्याने ८७ वर्षीय शेतकऱ्याने कुटुंबासह कर्जत तहसील कार्यालयात आमरण उपोषण सुरू केले.
बेनवडी (ता.कर्जत) येथील भाऊसाहेब रामभाऊ क्षीरसागर या ८७ वर्षीय शेतकऱ्यांची कुकडी डावा कालव्याच्या चिलवडी शाखा कालवा क्रमांक ६ ते १० कामासाठी गट नंबर १३० मधील एकूण १ हेक्टर १४ आर क्षेत्र शासनाच्या कुकडी विभागाने भु संपादित केले होते. या लाभ क्षेत्राची नुकसान भरपाई ८२ लाख ८२ हजार ४०८ रूपये रक्कम भाऊसाहेब क्षीरसागर यांची कसलीही संमती न घेता परस्पर वरील रकमेची विल्हेवाट अधिकारी आणि इतर लाभार्थीनी लाटली. याबाबत क्षीरसागर यांनी वारंवार कुकडी विभाग, जिल्हाधिकारी अहमदनगर आणि कर्जत तालुका प्रशासनाकडे पत्र व्यवहार करीत लक्ष वेधले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिवशी त्यांनी कुटुंबियांसह कुकडी विभागाच्या कोळवडी कार्यालयासमोर उपोषण देखील केले होते. त्यावेळी उपअधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ पुणे यांच्या अभिप्रायानुसार आठ दिवसांच्या आत योग्य ती कारवाई प्राधान्याने करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार १७ जानेवारी २३ ला अभिप्राय प्राप्त झाला असताना कुकडी कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ आर्थिक गैर लाभापोटी आजमितीस कोणतीही कायदेशीर कार्यवाही केली नाही. शासनाच्या कुकडी विभागाने भु संपादित केलेल्या शासकीय रकमेचे काय झाले ? ते कोणास आणि कोणत्या निकषाने वाटप झाले याची पाहणी करावी. यासह सदर प्रकरणात कार्यवाहीस दिरंगाई करणारे कुकडी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर उचित प्रशासकीय कारवाई करीत आपल्यास न्याय मिळावा अशी मागणी असताना उलट वरील अधिकारीच आपल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप निवेदनात भाऊसाहेब क्षीरसागर यांनी केला आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत कोणत्याच अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट दिली नव्हती. प्रशासन जीव गेल्यावरच दखल घेईल का ? असा सवाल उपस्थित करीत त्यांची कैफियत पत्रकारांकडे मांडली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा